‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’,विमानतळावर पोहचली महिला अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. ही विचित्र घटना मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये घडली. या महिलेने आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. या महिलेने घातलेला गोंधळ पाहून या प्रवेशद्वाराजवळ बघ्यांची गर्दी जमा झाला. विशेष म्हणजे या महिलेकडे विमानाचे कोणतेही तिकीट नव्हते. तिला विमानतळावर प्रवेश करायचा होता. तिकीट नसलं तरी बरंच सामान घेऊन ही महिला विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा, यासाठी सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांनी या महिलेचं काहीही ऐकून न घेता तिला थांबवलं. तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लागली . या महिलेने सुरक्षारक्षकांना मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला जात असून त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे, असं ही महिला सांगू लागली. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सारे लोकं मला सलाम कराल, असंही ही महिला सुरक्षारक्षकांना म्हणाली.

सुरक्षारक्षकांनी बऱ्याचदा समजावूनही या महिलेने गोंधळ सुरुच ठेवला. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. मागील काही दिवसांपासून ही महिला आपल्या घरातून पळून जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. अनेकदा ही महिला घरातून पळून जाते आणि बाहेरच्या लोकांशी कोणत्याही कारणावरुन वाद घालते असंही पोलिसांना समजलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपुरा येथील रहिवाशी असल्याचं समजलं. पोलिसांनी या महिलेच्या नातेवाईकांना शोधून काढलं. तपासामध्ये ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंदूर विमानतळावर अशाच प्रकारचा गोंधळ उडाला होता. एरोड्रम पोलीस आणि सीआयएसएफने हैदराबादवरुन आलेल्या एका प्रवासी मानसिक रुग्ण असल्याचे सांगत त्याला एमव्हायएच रुग्णालयामध्ये पाठवलं होतं. ४० वर्षीय रमेश हे ११ जानेवारी रोजी उज्जैन येथे देवदर्शनासाठी आले होते. नंतर ही व्यक्ती फ्रॅब्रिकेशन व्यापारी असल्याचे समजले. पोलिसांच्या बेजबाबदार वागण्यामुळे या व्यक्तीच्या नातेवाईकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.