दौंड नदीपात्रात सापडलेल्या महादेवाच्या मूर्तीचा झाला उलगडा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौड शहरातील भीमा नदी पत्रात सापडलेली महादेवाच्या मुखाची भग्न मूर्तीचा अखेर उलगडा झाला आहे. नदी पात्रात सापडलेली मूर्ती ही दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. ही मूर्ती 19 महिन्यांपूर्वी भीमा नदी पात्रात विसर्जित करण्यात आली होती.

दौंड येथील नदी पात्रातील ब्रिटीशकालीन दगडी रेल्वे पुलाशेजारी नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करण्यासाठी या ठिकाणी खोदकाम सुरु असताना 26 डिसेंबर रोजी एक अर्धनारीनटेश्वर महादेवाचे फक्त मुख असलेली मूर्ती आढळून आली होती. ही मूर्ती सिमेंट काँक्रिटची असून तीची उंची 5 फूट 7 इंच, रुंदी 2 फूट 9 इंच आहे. मूर्ती भग्न असली तरी नदी पात्रात सापडल्याने भक्तांनी या ठिकाणी पूजा करण्यास सुरुवात केली.

वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर नदी पात्रात मूर्ती सापडल्याचे वृत्त व्हायरल झाले. या वृत्तानंतर ही मूर्ती कुरकुंभ पासून 14 किमी असलेल्या जिरेगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. जिरेगाव येथील श्री दत्त मंदिराच्यावर सोळा वर्षापूर्वी ही मूर्ती बसवण्यात आली होती. या मंदिराच्या शिखराचे काम करावयाचे असल्याने महादेवाच्या मुखाची ही मूर्ती काढून ठेवण्यात आली होती. मात्र ती भग्न पावली. अशी मूर्ती मंदिरात ठेवणे योग्य नसल्याने तीचे नदीत विसर्जन करण्यात आल्याचे जिरेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सोनबा मचाले यांनी सांगितले.

सोनबा मचाले यांनी दिलेल्या माहितीला सरपंच भरत खोमणे यांनी दुजोरा दिला आहे. नदी पात्रात भग्न मूर्ती सापडल्यापासून भावीक त्याची पूजा करत असून काही अति उत्साही लोकांनी या मूर्तीला दुधाने दुग्धाभिषेक देखील घातला आहे.

जिरेगावचे पोलीस पाटील महादेव गाढवे यांनी सांगितले की, मंदिराच्या शिखराचे काम करायचे असल्याने ही मूर्ती काढून ठेवली होती. मात्र, मूर्ती भग्न झाल्याने या मूर्तीची विधीपूर्वक पूजा करुन ट्रॅक्टर-ट्रेलर मधून दौंड येथे ही मूर्ती आणली. याठिकाणी ग्रामस्थांसह मी मूर्तीचे विसर्झन नदीत केले होते.