Coronavirus : प्रिन्स चार्ल्स यांच्यासह जगातील ‘या’ 10 अतिमहत्वाच्या व्यक्तींना झाली ‘कोरोना’ची ‘लागण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे 5 लाखापेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. तर 21 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 175 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला असून अनेक देशांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. कोरोना व्हायरसने सामान्य नागरिकांपासून अति महत्त्वाच्या व्यक्तींना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. जगभरातील 10 व्हिआयपींना कोरोनाची लागण झाली आहे.

1. प्रिन्स चार्ल्स

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असताना ब्रिटनच्या राजघराण्यात देखील याचा शिरकाव झाला आहे. ब्रिटनमधील राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची पत्नी कॅमिला यांना मात्र कोरोनाची बाधा झाली नसून सध्या त्या स्कॉटलँडमध्ये आहेत.

2. बोरिस जॉन्सन

ब्रिटनमधील राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही घटना ताजी असताना आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. बोरिस जॉन्सन यांनी स्वत: या बातमीला दुजोरा दिला असून त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच ते आयसोलेशनमध्ये गेले.

3. मॅक हॅनकॉक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली असताना ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅक हॅनकॉक यांना देखील कोरनाची लागण झाली आहे. मॅक हॅनकॉक यांनी आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

4. प्रिन्स अल्बर्ट

मोनॅको देशाचे प्रिन्स अल्बर्ट यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल येण्याआधी त्यांनी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली होती.

5. पीटर डटन

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच ते अमेरिकेच्या दौऱ्यावरून ऑस्ट्रेलियात परतले होते. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. पीटर डटन यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

6. जर्मनीतील इस्त्राएलचे राजदूत

जर्मनीतील इस्त्राएलचे राजदूत जेमेरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जर्मनीच्या संसदीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ज्या अधिकाऱ्यांसोबत जेमेरी यांनी भेट घेतली होती त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

7. इराज हारिरकी

इराणचे उप आरोग्यमंत्री असलेले इराज हारिरकी यांना देखील कोरनाचा संसर्ग झाला आहे. तसेच इराणचे उपराष्ट्रपती मासूमेह यांना देखील कोरनाची लागण झाली आहे.

8. फ्रँक रिस्टर

फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री फ्रँक रिस्टर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. फ्रान्समधील कोरोनाची बाधा झालेले हे पहिले मंत्री आहेत. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.

9. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचे सचिव

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचे सचिव फॅबिओ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. फॅबिओ यांची कोरोनाची चाचणी होण्याआधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. याठिकाणी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.

10. मायकल बर्नियर

मायकल बर्नियर हे ब्रेक्झिटबाबतच्या मुख्य मुद्याचे यरोपीयन महासंघाचे मुख्य मध्यस्थ आहेत. त्यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.