चोरीच्या अफवांना लगाम घालण्यासाठी वैजापूर तालुक्यात इंटरनेट सेवा आठवडाभर बंद

ADV

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

सोशल नेटवर्कींग साईट्स मुळे कोणतीही घटना कमी कालावधीतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली जाते. अशा माध्यमांद्वारे पसरल्या जाणाऱ्या पोस्ट म्हणजे खरी घटना आहे कि अफवा याची शहानिशा केली जात नाही आणि त्यामुळे भलतेच काही घडते. आता या अफवांना आवरा कुणीतरी … असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ADV

औरंगाबाद मध्ये देखील गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात अफवांचे पेव फुटले आहे. जिल्ह्यात कुठे लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे तर कुठे हजार लोक जिल्ह्यात चोरी करण्यासाठी आले आहेत अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांचे बळी मात्र निर्दोष लोक ठरत आहेत. या अफवा सोशल मीडिया वरुन पसरवल्या जात आहेत. त्यामुळे आता या दोन गावांची इंटरनेट सेवाच आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चोरीच्या अफवा पसरवल्यामुळे आज पाडेगावमध्ये दोन संशयितांना शेकडो नागरिकांकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. छावणी पोलीस वेळीच पोहचल्यामुळे गावकऱ्यांच्या तावडीतून दोघांची सुटका करण्यात आली. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात घडली, चोर असल्याच्या संशयातून आठ जणांना मारहाण करण्यात आली होती, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. पाच-सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते, तर ४०० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यामुळे, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील गावांची इंटरनेट सुविधा आज (शुक्रवार १५ जून) पासून पुढील गुरुवार (दि. २१ जून) पर्यंत संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शांतता अबाधित राहावी याकरिता वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. चोरांच्या अफवेमुळे राज्यात इंटरनेट बंद करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.