अडानी, गोयंकाच्या इच्छेवर पडणार पाणी ?, BCC वाढविणार नाही IPL मधील टीम

मुंबई : आयपीएलमधील टीममध्ये आणखी २ संघ वाढवून त्यांची संख्या १० करण्याबाबत चर्चा सुरु होत असतानाच येत्या २०२१ मध्ये २ टीम वाढविणे शक्य होणार नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

अडानी ग्रुप आणि संजीव गोयंका आयपीएलची टीम विकत घेण्याच्या स्पर्धेत आहेत. अडानी यांनी यापूर्वीच आयपीएल टीम विकत घेण्याची इच्छा बोलून दाखविली होती. अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारले गेल्यानंतर त्यांची ही इच्छा आणखीच वाढली आहे. संजीव गोयंका रायजिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते. पुणे टीमला बंदी घालण्यात आली आहे. नव्या टीमसाठी टेंडर निघाले तर तेदेखील टीम विकत घेण्याचा विचार करत आहेत.

मात्र, या दोघांची इच्छा नव्या वर्षातील आयपीएल हंगामात पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही. आयपीएल २०२१मध्ये बीसीसीआय ८ च टीम मैदानात उतरवेल. २ टीम वाढविण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. २४ डिसेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत दोन टीम वाढविण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात होते. पण बीसीसीआयमध्येच एकमत होत नसल्याचे समोर आले आहे.

२०२१ साठी दोन नवीन टीम आणायला वेळ खूप कमी आहे. खासकरुन खेळाडुंचा लिलावही होणार आहे. काम जास्त आणि वेळ कमी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये दोन नवीन टीम आल्या तर त्या २०२२ मध्येच येण्याची शक्यता जास्त आहे, असे बीसीसी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.