IPL च्या दुसऱ्या टप्प्याचा मुहूर्त सापडला, BCCI च्या सभेत होणार घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १४ व्या पर्वातील काही सामने झाल्यानंतर उर्वरित सामने स्थगित करण्यात आले. अद्याप ३१ सामने बाकी असून हे सामने जर झाले नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) तब्बल दोन हजार ५०० कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने यातून मार्ग काढत आयपीएलचे उर्वरित सामने होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयने इंग्लड किंवा संयुक्त अरम अमिराती (यूएइ) येथे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला. त्यातील यूएइवर शिक्कामोर्तब करत सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात हे सामने खेळवले जाऊ शकतात. येत्या २९ मेला बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये याबाबतची घोषणा होणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना १८ ते २३ जून या कालावधीत होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या अंतिम सामन्यात त्यांना न्यूझीलंडशी सामना करावा लागणार आहे. त्यानंतर लगेचच ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. दरम्यान, ही मालिका जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरु करावी असा प्रस्ताव बीसीसीआयनं इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडे (इसीबी) ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यात आता एक नवा प्रस्ताव समोर असून त्यानुसार दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीतील कालावधी कमी करून तिसरी व पुढील दोन कसोटी सामने आधी खेळवण्याचा असा तो प्रस्ताव आहे. यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अतिरिक्त पाच दिवस मिळतील. यासंदर्भात अद्याप इसीबीकडे चर्चा करण्यात आली नसली तरी, पाच कसोटींसाठीच्या ४१ दिवसांमध्ये बदल केल्यास आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बीसीसीआयचा हा जर प्रस्ताव मान्य झाला तर १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील त्या अतिरिक्त दिवसांचे नियोजन केल्यास आयपीएलसाठी विंडो तयार होऊ शकते. म्हणजे ३० दिवस मिळू शकतात. त्यामुळे भारत, इंग्लंडच्या खेळाडूंना थेट लंडनहून यूएईत आणता येईल. तसेच २४ दिवसात साखळी सामने खेळवले जातील त्याचबरोबर शनिवार व रविवार डबलहेडर सामने होतील. इसीबीकडे बीसीसीआय अतिरिक्त पाच दिवसांचा प्रस्ताव ठेवणार आहे. कारण ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप १८ ऑक्टोबरपासून होणे अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठीही आयसीसीही यूएईचाच विचार करत आहे. तत्पूर्वी आयपीएलचे सामने होणार असल्याने खेळाडूंचा चांगला सराव होणार असला तरी खेळाडूंची दमछाक होणार हे मात्र नक्की आहे.