सत्‍ता येताच त्यांनी केल्या 4 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

बेंगलोर : वृत्‍तसंस्था

मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच बी.एस. येडीयुरप्पा यांनी कर्नाटक पोलिस दलातील 4 आयपीएस अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अतिरिक्‍त पोलिस महासंचालक तसेच पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे.

बुधवारी मध्यरात्रीनंतर सुप्रीम कोर्टात युक्‍तीवाद झाला आणि सुप्रीम कोर्टाने येडीयुरप्पा यांच्या शपथविधीस हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर गुरूवारी सकाळी 9 वाजता येडीयुरप्पा यांचा शपथविधी संपन्‍न झाला. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राज्य पोलिस दलातील 4 आयपीएस अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. बदल्या करण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये दोन वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांचा तसेच दोन राज्य गुप्‍तचर विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. येडीयुरप्पा यांनी आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यामुळे कर्नाटक पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.