‘आयएसआयएस’ विरुद्ध मोठी कार्यवाही ; दिल्ली पोलिसांचे १६ जागी छापे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – “हरकत-उल-हबर-ए-इस्लाम ” या मथळ्या खाली चालणाऱ्या आयसीआयएसच्या गुप्त कार्यवाहीस चाप लावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आज दिल्ली शहरासहित उत्तर प्रदेशात  १६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. अमरोहा येथील मदरशात हि या विषयी चौकशी करण्यात आली तर याच शहरात पाच संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची  माहिती राष्ट्रीय वृत्त संस्थेने दिली आहे.

राष्ट्रीय वृत्त संस्थेच्या माहिती नुसार दिल्ली पोलिसांना ‘आयएसआयएस’ च्या भारतात चालणाऱ्या कार्यवाही बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुप्तपणे एकाच वेळी १६ ठिकाणी छापे टाकण्यासाठी पथके रवाना केली. रवाना केलेल्या पथकांपैकी  काही पथके जाफराबादच्या दिशेने रवाना करण्यात आली तर काही पथके उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरात रवाना करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी एकाच वेळी १६ ठिकाणी कार्यवाही करून ५ संशियीत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून दारुगोळा,बॉम्ब बनवण्याचे सामान आणि बंदुकांचा साठा जप्त केला आहे. या संदर्भात पोलिसांनी विस्तारित माहिती देण्यास नकार दिला.  तर  आज बुधवारी सायंकाळी चार वाजता आम्ही पत्रकार परिषद घेऊन तपासाबद्दल अधिक माहिती देऊ असे दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

एनआयए, उत्तर प्रदेश एटीएस आणि  दिल्ली पोलीस यांची हि सध्या संयुक्त कार्यवाही सुरु असून अमरोहा मध्ये पोलिसांनी दिलेल्या तळामुळे शहराला पोलीस छावणीचे रूप आले आहे. अमरोहा मध्ये पोलीस कसून तपास करत असून या ठिकाणच्या बंद घराची पोलिसांकडून बारकाईने चौकशी केली जात आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून हाय अलर्ट दिला गेला होता. तर  मागील काही दिवसापूर्वी गुप्तचर खात्याने केंद्रीय गृह विभागाला महत्वाची माहिती दिली होती. गुप्तचर खात्याच्या माहिती नुसार ‘आयएसआयएस’  भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असून त्याला पायबंद घालण्यासाठी गृहखात्याकडून पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्या माहितीत सांगण्यात आले होते. याच माहितीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी हि कार्यवाही केली असण्याची संभाव्यता आहे.