यवतमाळच्या घटनेचं अखेर धक्कादायक कारण आलं पुढं, डॉक्टरनंच मुलांना पोलिओऐवजी पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणा दरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणामुळे १२ बालकांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. मात्र आता या प्रकरणाच्या चौकशीनंतर मोबाईलवर व्यस्त असल्यानं डॉक्टरने पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. तसेच महाराष्ट्रातही पोलिओ लसीकरणाची मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आणि यवतमाळ येथे ही घटना पुढे आली होती. दरम्यान सॅनिटायझर दिलेल्या १२ मुलांना सुरक्षितता म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. संबंधित प्रकरणात तेथील वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका या तीन जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले.

या दरम्यान तेथील वरिष्ठ डॉक्टरांवरही निलंबनासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाण्याचे संकेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले. भंडारा येथील दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठ डॉक्टरांना सोडता कामा नये, असे मत व्यक्त केले जात आहे. ते १२ मुले ठणठणीत आहेत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी यवतमाळमधील शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी माहिती दिली आहे.