जगनमोहन रेड्डी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ ; अनेक नेते उपस्थित

विजयवाडा : पोलिसनामा ऑनलाईन – वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांचीही हजेरी होती. दरम्यान, तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव देखील या शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगन मोहन रेड्डी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी हैदराबादमध्ये आईजीएमसी स्टेडियम येथे आयोजित भव्य समारोहात राज्यपाल नरसिम्हन यांच्याकडून शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमासाठी जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपीचे एन. चंद्राबाबू नायडू यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने विधानसभेच्या 175 जागांपैकी 151 जागा जिंकल्या आहेत तर लोकसभेच्या 25 जागांपैकी 22 जागा जिंकत मोठा विजय मिळविला आहे.

शपथविधी समारंभानंतर राज्यपाल नरसिंहन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव दिल्ली येथील पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळाची स्थापना ७ जूनला होऊ शकते.