दिल्ली हादरविण्याचा हल्ल्याचा कट उधळला, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या 2 दहशतवाद्यांना अटक

पोलीसनामा ऑनलाईन : दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला असून जैश-ए-मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक (Jaish E Mohammed Terrorists Arrested In Delhi) केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (Delhi Police Special Cell) ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे.

अब्दुल लतिफ मीर आणि मोहम्मद अशरफ खतना अशी या दोघा संशयित दहशतावाद्यांची नावे आहेत. अब्दुलचे वय 22 असून तो बारामुल्लाचा रहिवासी आहे. तर 20 वर्षीय अशरफ कुपवारामध्ये वास्तव्यास आहे.

 

एएनआयने (ANI) यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अटकेच्या कारवाई करण्यासाठी सोमवारी (दि. 16) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिलेनियम पार्कजवळ सापळा रचला होता. जम्मू काश्मीरचे निवासी असणाऱ्या या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांच्याकडे दोन अ‍ॅटोमॅटिक पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूस सापडली आहेत.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात देखील दिल्ली पोलिसांनी आयएसच्या दहशतवाद्याला अटक करत हल्ल्याचा कट उधळला होता. पोलिसांनी यावेळी 13 किलो आईडी जप्त केले होते.