CBI च्या प्रमुखपदी जयस्वाल यांच्या नियुक्तीने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र केडरच्या पोलीस अधिकार्‍याची सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती होणे ही खरं तर राज्यासाठी भुषणास्पद बाब आहे. असे असेल तरी महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही नियुक्ती डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यावरुन जयस्वाल यांचे राज्य शासनाबरोबर खटके उडाले होते. याच कारणावरुन भाजपाच्या काळात केंद्रीय सेवेतून महाराष्ट्रात परत आलेले सुबोधकुमार जयस्वाल हे पुन्हा केंद्रीय सेवेत गेले होते. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गुन्ह्यांच्या तपासासाठी सीबीआयला परवानगी नाकारली आहे. असे असले तरी त्याअगोदरचे अनेक गुन्हे तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख असतानाच त्यांचे जयस्वाल यांच्याबरोबर खटके उडाले होते. त्या अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे. या प्रकरणाचा तपास आता त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे देशमुखासह राज्य सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुबोधकुमार जयस्वाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलीस दलात परत आणले. जुलै २०१८ मध्ये त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये त्यांनी पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या वाद सुरु झाला. काही पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर त्या पुन्हा रद्द केल्या गेल्या.

कोरोनाच्या संसर्ग, लॉकडाऊन या काळात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या या वारंवार पुढे ढकलल्या गेल्या. त्यातून राज्य शासन व जयस्वाल यांच्यामध्ये अंतर पडत गेले. अखेर जयस्वाल यांनी केंद्रात परतण्याचा निर्णय घेतला़. गृहमंत्रालयाने त्यांना केंद्रात परत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली. जयस्वाल यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉमध्ये ते वरिष्ट पदावर होते. तेलगी स्टॅम्प पेपर गैरव्यवहारप्रकरणाचा त्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीने तपास केला होता.