महाराष्ट्रातील ‘या’ शहरात रात्री बाहेर पडल्यास होणार कोरोना टेस्ट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात आज (दि. 14) रात्री आठ वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह संचारबंदीची घोषणा केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रात्री घराबाहेर पडण्यास निर्बंध असतानाही अनेकजण कोरोनाची भीती न बाळगता सर्रासपणे घराबाहेर पडत होते. यावर भुसावळ पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार रात्रीच्या संचारबंदीच्या काळात जे नागरिक रस्त्यावर बाहेर दिसतील अशा नागरिकांची त्याच ठिकाणी रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यास शहरात सुरुवात केली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या या आदेशामुळे नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर तर आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

भुसावळ नगरपालिकेतील पालिकेतील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वतीने शहरातील अष्टभुजा चौकामध्ये संचारबंदीच्या काळात जे नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट केली जात आहे. याठिकाणी तैनात असणारे पोलीस कर्मचारी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यासाठी थांबवत आहेत. यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात भरती केले जाणार आहे. दरम्यान अशी चाचणी केल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील आणि इतरांना त्यांच्यापासून प्रसार होणार नाही हा यामागचा उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी सांगितले.