Jalgaon News : खळबळजनक ! जळगावमध्ये 13 वर्षाच्या मुलानं केली आत्महत्या, गळफास घेण्यापुर्वी वेबसाईटवरून घेतली माहिती

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील १३ वर्षीय शाळकरी मुलाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्या मुलाने आत्महत्येपूर्वी मोबाइलवर सोशल नेटवर्किंग साइटवर आत्महत्येसंदर्भात माहिती शोधल्याचे असे तपासात निष्पन्न झाले आहे.

अधिक माहिती अशी की, शिंदखेडा येथे राहणारा हर्षल ८ वीच्या वर्गात शिकत होता. कोरोना लॉकडाऊननंतर तीन ते चार महिन्यांपासून तो जळगाव येथील तुकारामवाडीत त्याचे मामा दीपक भदाणे यांच्याकडे राहायला होता. मंगळवारी त्याचे मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते. तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोनच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली होती. त्या दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तुकारामवाडीतील काही नागरिकांनी हर्षलला तातडीने सुरुवातीला खासगी रुग्णालयात, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मात्र त्या वेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

पोलीसाने दिलेल्या माहितीनुसार, हर्षल याच्याकडे मोबाइल होता. मोबाइलमध्ये त्याने वेबसाइट ओपन करून पाहिली आहे. या वेबसाइटवर त्याने मृत्यूबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.