Jalgaon News : चाळीसगावचे जवान सागर धनगर मणिपूर येथे शहीद

चाळीसगाव/जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मणीपूर येथील सेनापती येथे झालेल्या हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर (वय-27) हे शहिद झाले आहेत. ही घटना आज (रविवार) पहाटे दोनच्या सुमारास घडली. सागर धनगर यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सागर धनगर हे नोव्हेंबर 2017 मध्ये 5, मराठा इन्फ्रंटी बाटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव 1 फेब्रुवारी (सोमवार) रोजी दुपारी दोन वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते मुंबई विमानतळावर सायंकाळी 7.15 वाजता पोहचले. त्यानंतर ते शक्यतो मंगळवार (दि.2) त्यांच्या मुळगावी आणण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळत आहे.

सागर रामा धनगर यांच्यावर त्यांच्या मुळगावी तांबोळे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. सागर धनगर यांना विरमरण आल्याचे वृत्त गावात समजताच गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.