जळगावात जन्मले माशाच्या आकाराचं बाळ, पण…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात एका महिलेने वेगळीच शरीररचना असलेल्या बाळाला जन्म दिला. महिलेने शुक्रवारी या बाळाला जन्म दिला. जन्मलेल्या बाळाची शरीररचना ही माशाप्रमाणे दिसत होती. मात्र शनिवारी दुपारी या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बाळाच्या वाट्याला केवळ 12 तासांचे आयुष्य आले. या बाळाचा मृतदेह शरीररचनाशास्त्र विभागात ठेवण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील धरणगाव तालुक्यातील एका महिला शुक्रवारी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. दुपारी चारच्या सुमारास महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. जन्मलेल्या बाळाची शरीराची घडण अत्यंत दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. प्रसूतीपूर्वी महिलेची सोनोग्राफी करण्यात आली होती. मात्र, त्यात बाळाच्या शारीरिक व्यंगाविषयी काहीही समोर आले नव्हते. मात्र, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीराचा आकार एखाद्या माशाप्रमाणे असल्याचे दिसून आले.

स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी माहिती देताना सांगितले की, या बाळाच्या पोटाखालील पूर्ण भाग म्हणजेच दोन्ही पाय हे एकमेकांना चिकटलेले होते. त्याच्या शरीराची रचना ही एखाद्या माशासारखी होती. पोटाखाली संपूर्ण भागात व्यंग होते. याशिवाय बाळाला किडनी नव्हती. या व्यंगाला वैद्यकीय भाषेत ‘सिरोनोमेलिया’ असे म्हटले जाते. म्हणजेच मत्सपरी अशा प्रकारची बालके ही अतिदुर्मिळ पद्धतीने जन्माला येत असतात आणि त्याचे जीवनमान हे अत्यंत कमी म्हणजे काही तासांचे असते. परंतु हे बाळ 12 तास जिवंत राहिले होते.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा पर्यावरणीय व जनुकीय परिणाम असू शकतो. याबाबत ठोस पुरावे नसले तरी प्राथमिक अंदाज असू शकतो. बाळाची आईच्या पोटात जडणघडण होत असताना बाळाच्या धमन्यांना सुरळीत रक्तपुरवठा न झाल्यास अशा प्रकारचे व्यंग येण्याची शक्यता असते. आंबेजोगाई येथेही अशाच प्रकारचे एक दुर्मिळ बाळ जन्माला आले होते.