‘कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे प्रशासक’ ! जयंत पाटलांनी जुना फोटो शेअर करत नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतीच राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील फोटो शेअर करुन अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Jayant Patil shared an old photo and wished the new Home Minister dilip walse patil)

दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप-वळसे पाटील यांनी सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. यासोबतच, त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केले आहे.

“माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!” असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. याप्रकरणी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टाने अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.

अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट निलंबित API सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती देखील यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. यासोबतच कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.