ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेच्या नावात ८१व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव येणार असले तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची संकल्पना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडल्यानंतर योजनेचा प्रस्ताव विभागामार्फत तयार केला जात आहे.येणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हि योजना जाहीर करण्याची तयारी सुरु झाली आहे.

साठी ओलांडल्यानंतर आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे समजण्यासाठी सर्व प्रथम आरोग्य तपासण्या होणे गरजेचे असते. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकजण आरोग्य तपासणी करत नाहीत. काही वेळा वेळ मारून नेह्ण्याचा प्रकार घडतो. मग अचानक मोठ्या आजाराचे निदान झाल्यानंतर प्रकृती हाताबाहेर जाते. त्या ऐवजी वेळीच सर्व आरोग्य तपासण्या केल्या तर नंतर उद्भवणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारी टाळता येतील हा योजनेचा उद्देश आहे.

सध्या राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीची कोणतीही योजना नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. जे त्यातून बरे झाले त्यांच्या तब्येतीचे वेगळे प्रश्न आता समोर येत आहेत. अशावेळी सर्वच ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार हा विषय अधिक गंभीर बनला असताना या योजनेद्वारे त्यांना दिलासा मिळणार आहे.

योजनेच्या बाहेर असलेल्यांना प्रसंगी अनुदान
यासंदर्भात बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मोफत आरोग्य तपासणीवरच ज्येष्ठ नागरिकांवर न थांबता उपचारासाठी उपलब्ध करून देणे आणि जे ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या बाहेर आहेत त्यांना प्रसंगी अनुदान देणे असे ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजनेचे स्वरूप असेल.