जेष्ठ अभिनेते कादर खान यांच्या संदर्भातील ‘ते’ वृत्त खोटे

मुंबई : वृत्तसंस्था – ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती काही दिवसांपासून गंभीर आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सध्या कॅनडामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशात रविवारी मध्यरात्रीपासून कादर खान यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मात्र, कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची आणि अफवा असल्याचे मुलगा सरफराज खान यांनी सांगितले. दरम्यान, कादर खान यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी इच्छा बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
पडद्यावर दमदार अभिनय सादर करणाऱ्या, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ८१ वर्षाय कादर खान यांनी जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. अभिनेता आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांनी चांगलेच नाव कमावले आहे.
कादर खान यांनी ‘दाग’ या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘कुली’, ‘होशियार’, ‘हत्या’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले.त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.