‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये नाही दिसणार करीना कपूरचे बेबी बंप, मेसर्कनी केलं ‘जुगाड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी अलीकडेच जाहीर केले की, ते लवकरच दुसर्‍या मुलाचे पालक होणार आहेत. मागच्या वेळेप्रमाणे या वेळेसही करीना गरोदरपणात ब्रेक घेण्याच्या मन:स्थितीत नाही. ती या दरम्यानही सतत काम करेल. सध्या करीनाचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’चे बरेच शूटिंग बाकी आहे. अशा परिस्थितीत लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये करीना बेबी बंपसह शूट कसे करेल, याबाबत अंदाज लावला जात आहे. अखेर निर्मात्यांनी यासाठी एक मार्ग शोधला आहे.

सूत्रांनी सांगितले की, करीनाचा बेबी बंप आता दिसू लागला असल्याने तो लपवण्यासाठी आता व्हीएफएक्सचा वापर केला जाईल. ते पुढे म्हणाले की, ‘लाल सिंह चड्ढा’साठी करीनाला अद्याप १०० दिवसांचे शूटिंग करायचे आहे. अशा परिस्थितीत ती सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये फिल्मच्या टीममध्ये सामील होईल आणि तिचा पार्ट पूर्ण शूट करेल अशी अपेक्षा आहे.

आमिर खान आणि करीनाने या चित्रपटाच्या शूटिंगला खूप आधी सुरुवात केली होती, पण कोरोनामुळे शूट थांबवावे लागले. नुकताच आमिर तुर्कीला शूटिंगसाठी नवीन लोकेशन्स पाहण्यासाठी गेला होता. त्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते.

पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार ‘लाल सिंह चड्ढा’
आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ अगोदर २०२० च्या ख्रिसमसला रिलीज होणार होता, पण आता तो २०२१ च्या ख्रिसमसला रिलीज होईल. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम हँक्सच्या ‘द फॉरेस्ट गम्प’ वर आधारित आहे. लॉकडाऊनपूर्वी चित्रपटाचे काही भाग चंदीगड आणि कोलकाता येथे शूट करण्यात आले आहेत.