अजब : गुन्हा केलेला नसताना 40 वर्षापर्यंत ठेवले जेलमध्ये, सुटल्यानंतर मिळाली 149 कोटींची भरपाई

नवी दिल्ली : जगात असे असंख्य कैदी जेलमध्ये बंद आहेत, ज्यांचा कोणाताही गुन्हा नसताना ठेवण्यात आले आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका कैद्याला गुन्हा केलेला नसताना 40 वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर जेव्हा तो सुटला तेव्हा त्यास 149 कोटी रूपयांची भरपाई देण्यात आली. या घटनेबाबत ऐकून सर्वजण हैराण झाले होते.

कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅलीत राहणार्‍या या व्यक्तीवर त्याची गर्लफ्रेंड तसेच त्याच्या चार वर्षाच्या मुलाच्या हत्येचा चुकीचा आरोप करण्यात आला होता. क्रेग कोले नावाच्या या व्यक्तीला 2017 मध्ये निर्दोष ठरवून सोडण्यात आले. यानंतर भरपाई म्हणून 21 मिलियन डॉलरची रक्कम म्हणजे सुमारे 149 कोटी रूपये देण्यात आले होते. क्रेगला ही भरपाई अनेक वर्ष चाललेल्या दिर्घ, खर्चिक तसेच विनाकारणाच्या कायदेशीर कारवाईनंतर नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली.

सिटी मॅनेजरने या संबंधी वक्तव्य जारी करताना म्हटले होते की, क्रेगने जे 40 वर्षांपासून सहन केले आहे, त्याची भरपाई कोणत्याही किमतीने होऊ शकत नाही. यासाठी कोणतीही किंमत पुरेशी नाही. मात्र, हा एक छोटा प्रयत्न आहे की, तो आपले पुढील आयुष्य यातून थोडे चांगले करू शकतो.

जे पैसे क्रेगला देण्यात आले, त्यापैकी 4.9 मिलियन डॉलरची रक्कम कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. याशिवाय बाकीची रक्कम इन्श्युरन्स तसेच इतर स्त्रोतांकडून देण्यात आली. 1978 मध्ये क्रेगला आपली 24 वर्षीय गर्लफ्रेंड तसेच मुलाला ठार करण्याच्या आरोपात दोषी ठरवले होते. मात्र, प्रकरणाचा पुन्हा तपास आणि डीएनए टेस्टनंतर तो निर्दोष ठरला.

क्रेगने निर्दोष ठरण्याच्या या लढाईत जी सर्वात महागडी किंमत चुकवली ती म्हणजे त्याच्या आई-वडिलांचा जीव. त्याला कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी आपले घर गहाण ठेवले होते. यानंतर अनेक धक्के खाऊन अखेर त्यांचा मृत्यू झाला होता.