राहुल गांधींना मोठा धक्का ! वायनाडमध्येच 4 प्रमुख नेत्यांचा कॉंग्रेसला ‘रामराम’

कोची : वृत्तसंस्था – केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील राजकारण तापू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केरळ दौऱ्यावर असून त्यांच्याच मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या चार प्रमुख नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे भावी पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाणारे राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राहुल गांधी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यावेळी त्यांना वायनाड मतदारसंघाने पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते. मात्र आता काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाड मतदारसंघामधून नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. केरळचे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला काँग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन आदीनी पक्षाला रामराम केले आहे. या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे.