कौतुकास्पद ! दिव्यांग विडी कामगारानं दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 लाख, म्हणाला – ‘मी विडया वळून…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या संकटाने देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. दररोज तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने देशाची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीतही काही घटना पुन्हा नव्या दमाने लढायला प्रोत्साहित करतात. केरळमधील कुन्नूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीसाठी येथील एका विडी कामगाराने चक्क दोन लाख रुपयांची मदत केली आहे. या कामगाराच्या खात्यात आता केवळ ८५० रुपये शिल्लक उरले आहेत. या विडी कामगाराबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आली नाही. मात्र, त्याचे मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजचजण कौतुक करताना दिसत आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शनिवारी सायंकाळी ट्विटरवरुन या व्यक्तीचं कौतुक केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी अनेक जण मदत करतात. पण खात्यावर २ लाख ८५० रुपये असताना त्यातील दोन लाख मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी देणे म्हणजे आपलं एकमेकांबद्दल असणारं प्रेमच आपल्याला इतरांहून वेगळं बनवतं. पुन्हा एकदा सर्वांचे आभार असं म्हंटल आहे.

इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले असून त्यामध्ये असे म्हंटले आहे की, बँकेकडे संबंधित विडी कामगाराने दोन लाख दान करण्यासंदर्भातील माहिती दिली तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना एवढी मोठी रक्कम का देत असे संबंधित बिडी कामगाराला विचारले. त्यावर त्याने मी अजूनही विड्या वळून जगण्यासाठी पैसे कमवू शकतो, असं सांगितलं. तसेच आपण दिव्यांग असल्याने आपल्याला पेन्शनची रक्कम मिळत असल्याचेही त्याने सांगितले.

रविवारी केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनीही या विडी कामगारासंदर्भातील ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, लसीकरणाचे मोठे आव्हान केरळसमोर आहे.कुन्नरच्या एका विडी कामगाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख दान करत स्वतः जवळ केवळ ८५० रुपये ठेवले. बँकेच्या कर्मचाऱयांनीही पैसे वळवून घेण्यासंदर्भात शंका होती. मात्र या कामगाराने आपण अजून काम करू शकतो तसेच दिव्यांग पेन्शन मिळत असते त्यामुळे आपला उदरनिर्वाह होऊ शकतो असे त्यांने सांगितले. लोकांनी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत असंही त्यांनी म्हंटल आहे.

कोरोनाच्या संकटात केरळ सरकारला लसीकरणासाठी थेट निर्मात्यांकडून लसी घ्याव्या लागणार आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेत मुख्यमंत्री मदतनिधीसाठी हजारो लोकांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. मूळचे केरळचे पण सध्या बाहेर असणाऱ्या लोकांनीही पैसे देण्यास सुरुवात केल्याने मुख्यमंत्री निधीमध्ये ५० लाखांचा निधी काही दिवसात जामा झाला आहे.