शबरीमाला मंदिरप्रवेश : तृप्ती देसार्इंना अडविण्यासाठी विमानतळाबाहेर विरोधकांची गर्दी

कोची : वृत्तसंस्था – शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारल्याने तृप्ती देसाई यांनी मंदिर प्रवेश करण्याचा निश्चिय जाहीर केला होता. यासंदर्भात त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही केली होती. ठरल्याप्रमाणे शबरीमाला मंदिर प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केरळकडे रवाना झाल्या आहेत. परंतु, येथील विमानतळावर आगमन होण्यापूर्वीच त्यांना विरोध करण्यासाठी काही हिंदूत्ववाद्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केली आहे. याप्रकारामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता असून देसाई मंदिरापर्यंत कशा पोहचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत यापूर्वीच हिंदुत्ववादी गटांकडून भाजपा आणि स्थानिक लोकांकडून सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावत महिलांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. शबरीमाला मंदिराचे दरवाजे पुन्हा खोलण्यात येणार असल्याने शनिवारी तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक पुरोगामी महिलांनी केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे. केरळ सरकारही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत महिलांना संरक्षण पुरवत आहे. मात्र, परंपरांवर आघात असल्याचे सांगत भाजपा, हिंदुत्ववादी गट आणि स्थानिक लोकांनी महिलांच्या प्रवेशाला विरोध केला आहे.

महिलांना प्रवेश देण्यावरून अनेक हिंसाचाराच्या घटनाही मागील दोन महिन्यांत येथे घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाईंनी आता मंदिर प्रवेशाचा आग्रह धरत असून त्या केरळकडे रवाना झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच त्यांना विमानतळावरच अडविण्याचा प्रयत्न महिलाविरोधी काही हिंदूत्ववादी करत असल्याने त्यांचे हे आंदोलन कसे पार पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते यावरही तृप्ती देसाई यांचा शबरीमाला मंदिर प्रवेश होणार की नाही हे ठरणार आहे.