दुर्देवी ! माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील अन् माजी नगरसेविका निर्मला पाटील या दाम्पत्यांचा कोविडमुळं एकाच दिवशी मृत्यू

खोपोली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. अनेकांचे हसतं-खेळत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, रोहिदास पाटील (वय 65) आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निर्मला पाटील (60) यांचे कोरोनाने शुक्रवारी (दि. 30) एकाच दिवशी निधन झाले. पाटील पती-पत्नींचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे खोपोलीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी ,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

लौजी परिसरातून निवडून येणारे रोहिदास पाटील सलग 35 वर्ष नगरसेवक होते. त्यातील सलग 15 वर्ष ते शिक्षण मंडळाचे सभापती होते. 1985 साली त्यांनी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. पाटील यांनी शिक्षण मंडळाचे सभापती असताना अनेक चांगले उपक्रम राबवले होते. रोहिदास पाटील यांच्या जाण्यामुळे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व तसेच शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार हरपला आहे, अशा शब्दात शिक्षण मंडळाचे माजी सभापती रामकृष्ण तावडे यांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.