नांदेड जिल्ह्यात अपहरण केलेल्या चिमुरडीची हत्या

नांदेड : पोलिसनामा ऑनलाईन 

नायगाव तालुक्यातील मांजरम येथील अपहरण केलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह गावाशेजारच्या विहीरीत सापडल्याने खळबळ उडाली.

मांजरम येथील उत्तम पोणीराम वंजारे यांची सहा वर्षाची चिमुकली रितिका ही २० जून रोजी अंगणात खेळत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास नातेवाईक आरोपी श्रावण दशरथ गजभारे याने मुलीचे बोट धरून तिला नेले. दोन तास झाले तरी मुलगी परत आली नसल्याने आई वडिलांनी शोधाशोध सुरु केली. तेवढ्यात रितिकाला तिचा नातेवाईक घेवून जात असताना तिच्या चुलत भावाने पाहिले. कळताच वडिलांनी श्रावणकडे विचारणा केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नायगाव ठाणे गाठून वडिलांनी फिर्याद नोंदवली. यावरून श्रावणविरूद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा नोंद झाला असला तरी आई वडिलांसह नातेवाईकांनी रितिकाचा शोध घेतला. आरोपीवरही पाळत ठेवली. मात्र चिमुरडी सापडण्याअगोरच श्रावण पसार झाला. आरोपीसह मुलीचाही शोध सुरू असताना मांजरमशेजारील एका विहिरीत चिमुरडीचा मृतदेह आढळला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण दशरथ गजभारे हा नातेवाईक असून तो पसार झाला आहे.