सुकामेवा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही खास टीप्स ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सुकामेवा सर्वच लोक आवडीनं खातात. घरात अनेक प्रकारचे सुक्यामेव्याचे पदार्थ आणले जातात. परंतु काही दिवसांनी यातील काही पदार्थ खराब होतात. जर तुम्हालाही सुकामेवा वर्षभरासाठी टिकवून ठेवायचा असेल तर तो कशा प्रकारे साठवून ठेवला पाहिजे यासाठी आपण काही टीप्स जाणून घेणार आहोत.

1) सुकामेवा ताजा असल्याची खात्री करणं – बाजारात कधीही सुक्यामेव्याची खरेदी करताना तो ताजा आहे याची खात्री करावी. कारण ते जर ताजे नसतील किंवा जुने असतील तर लवकर खराब होण्याची शक्यता असते. चवीलाही ते खऊट लागतात.

2) हवाबंद डब्यात ठेवा – सुकामेवा हवेच्या संपर्कात आल्यानं लवकर खराब होतो. त्यामुळं शक्यतो ते हवाबंद डब्यात ठेवा. सुक्या मेव्याचा हवेशी संपर्क आल्यानं ते मऊ पडण्याची शक्यता असते. तसंच काही वेळा मनुक्यांना पाणी देखील सुटतं आणि ते चिकट होतात.

3) थंड आणि कोरड्या जागी ठेवा – कधीही सुक्यामेव्याची साठवणूक करताना तो थंड आणि कोरड्या जागेवर ठेवा. जास्त उष्ण ठिकाणी त्यांना ठेवल्यास ते लवकर खराब होतात. तसंच ओलसर जागी ठेवल्यास त्यांना बुरशी देखील लागू शकते. शक्यतो ते थंड आणि कोरड्या जागी ठेवावेत.