पर्रीकरांच्या जागी मध्यरात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे सावंत नेमके आहेत कोण ?

पणजी : गोवा वृत्तसंस्था  – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी रात्री निधन झाल्यानंतर सोमवारी उत्तररात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सांवत हे दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या अत्यंत जवळचे असल्याचे मानले जाते. तसेच पर्रीकरांनी साधेपणाचा घालून दिलेला आदर्श पाळण्याची क्षमता हि प्रमोद सांवत यांच्या व्यक्तिमत्वात असल्यानेच त्यांना मुख्यमंत्री पदी नेमण्यात आले आहे.

प्रमोद सांवत हे उत्तर गोवा भागातील सांखळी मतदारसंघाचे आमदार आहेत. प्रमोद सांवत हे पेशाने डॉक्टर आहेत. पर्रीकरांनंतर त्यांच्या सारखाच उच्च शिक्षित व्यक्ती गोव्याच्या मुख्यमंत्री पदी बसवण्याचा निर्धार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता. म्हणून प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. प्रमोद सांवत यांच्याकडे आयुर्वेदिक क्षेत्रात वैद्यकीय शिक्षणाची पदवी आहे. त्याचप्रमाणे त्यांचे संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व पर्रीकरांच्या माघारी त्यांची भूमिका चोख बजावू शकते असा भाजपश्रेष्ठींना विश्वास आहे. म्हणूनच त्यांची निवड मुख्यमंत्री पदी करण्यात आली आहे. पर्रीकर मुख्यमंत्री असताना प्रमोद सावंत हे गोवा विधान सभेचे अध्यक्ष होते. पर्रीकरांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे सावंत यांना विधानसभेच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात यावे अशी मागणी देखील काँग्रेसने मागील काही महिन्यापूर्वी राज्यपालांकडे केली होती.

गोवा विधानसभा हि ४० जागांची आहे. त्यापैकी ३ जागा या रिक्त आहेत. त्या ठिकाणी २३ एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुकीसोबत पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे बहुमतासाठी गोवा विधानसभेत १९ जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे स्वतःचे १२ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांचे प्रत्येकी ३ तसेच ३ अपक्ष आमदार असे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजप विधानसभेत आपले बहुमत सहज सिद्ध करू शकणार आहे.

प्रमोद सावंत यांचा अल्प परिचय –

प्रमोद सावंत हे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला असून त्यांच शिक्षण कोल्हापूर व पुणे याठिकाणी झालं आहे . कोल्हापूरमधील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून त्यांनी बीएएमएसची डिग्री पूर्ण केली आहे.

तसेच पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्कची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. प्रमोद सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत हे जनसंघाने नेते होते. त्यांनी पाळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. तसेच प्रमोद सावंतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अनुपस्थितीत ध्वजारोहणाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली होती.