नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रविवारी 83 दिवसांच्या अंतरानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी दररोज किंमतींचा आढावा पुन्हा सुरू केला आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तेलाच्या किंमती वाढत आहेत. देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जारी केलेले निर्बंध शिथिल केल्यांनतर इंधनाची मागणी वाढली, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाल्याने किंमती वाढल्या आहेत. लॉकडाऊन हळूहळू शिथिल झाल्यानंतर आता खासगी वाहने आणि ऑटो टॅक्सी चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या तीन टप्प्यांपर्यंत रस्त्यावर काहीच वाहने धावत होती.
तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दैनिक आधारावर किमतीचा आढावा पुन्हा सुरु झाला आहेत. तेल कंपन्या एटीएफ आणि एलपीजीच्या किंमतींचा नियमितपणे आढावा घेत असले तरी, 16 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही.
14 मार्च रोजी उत्पादन शुल्कात करण्यात आली वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याचा फायदा घेण्यासाठी सरकारने 14 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ केली, त्यानंतर तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) दररोज किंमतींचा आढावा घेणे थांबवले होते. यानंतर 6 मे रोजी पुन्हा एकदा सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली. या वाढीनंतर पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क 32.98 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर 31.83 रुपये प्रतिलिटर झाले. तेल कंपन्यांनी उत्पादन शुल्कातील वाढीचा भार ग्राहकांवर टाकला नाही, त्याऐवजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली आल्यामुळे त्याचे समायोजन करण्यात आले.
जुलैअखेरपर्यंत ओपेक आणि त्याच्या संबंधित देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन एका महिन्यात सुमारे एक कोटी बॅरलने वाढविले आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता बाजार स्थिर होण्याच्या आशेने हे पाऊल उचलले गेले आहे. चीनमध्ये तेलाची मागणी वाढत गेल्यामुळे सौदीने किंमती वाढवल्या आहेत. सौदी अरामकोने आशिया खंडात अरब लाइट्सची किंमत प्रति बॅरल 6.10 ने वाढविली आहे. दरम्यान नरेंद्र मोदी सरकारने मे 2014 मध्ये प्रथमच सत्ता स्वीकारली तेव्हा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 9.48 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रतिलिटर इतके शुल्क होते.
थांबविला गेला होता दैनिक आढावा
कोरोना विषाणूच्या साथीमुळे एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची किंमत एका दशकाच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचली. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेलाच्या किंमतींचा दररोजचा आढावा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अत्यधिक चढ-उतारांमुळे थांबविला गेला. आता जेव्हा बाजारात काही प्रमाणात स्थिरता दर्शविली गेली आहे, तेव्हा दररोज किंमतीचे पुनरावलोकन सुरू केले गेले आहे. दरम्यान , आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उलाढाल असूनही तेल कंपन्यांनी विमानातील इंधन एटीएफ आणि एलपीजीच्या किंमतींमध्ये सातत्याने बदल केले आहेत.