कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेस 1 फेब्रुवारीपासून रुळावर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेसही रेल्वे गाडी येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर – वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शनिवारी (दि. 23) व्हर्च्युल पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे प्रवासी वाहतुकपूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होणार याबाबत मित्तल म्हणाले की, राज्य शासनाशी रेल्वे विभाग समन्वय साधून आहे. आता विशेष रेल्वे गाड्याही सुरू केल्या आहेत. याशिवाय दिर्घपल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करीत आहोत. कोरोनाची स्थितीबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सुचना व कोरोनाची स्थिती विचारात घेऊन गाड्या सुरू करण्यावर आमचा भर आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत मित्तल म्हणाले की, कोल्हापूर -वैभववाडी मार्गाचे सर्व्हेक्षण करून डीपीआरही केंद्रीय रेल्वे विभागाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र निधी अभावी पुढे काम होऊ शकलेले नाही. अशीच अन्य तांत्रीक कामे निधी अभावी अपूर्ण आहेत ती येत्या वर्षभरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर -पुणे नव्या रेल्वे मार्गाबाबत मित्तल म्हणाले की, हा प्रकल्प महारेलच्या अखत्यारीतील आहे, त्या मार्गाबाबत महारेल सोबत काही चर्चा झाल्या आहेत. या मार्गासाठी महारेलने आमच्याकडे तांत्रीक मार्गदर्शन मागविल्यास आम्ही तेही देण्यास तयार आहोत.