Kolhapur News : जिल्ह्यात विनानंबर, नियमबाह्य 525 वाहनांवर कारवाई, पोलीस अधीक्षकांचे आदेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यात विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. एका दिवसात तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर (Kolhapur ) शहरात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते तसेच पर्यटकांचीही गर्दी वाढते. याचा फायदा घेत चेनस्नॅचिंग, पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

प्रामुख्याने या गुन्ह्यात विनानंबर अथवा नंबरप्लेट अर्धवट असलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानुसार विनानंबर प्लेट, नियमबाह्य नंबरप्लेट, अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट अगर नंबर प्लेटवरच नंबरमध्ये खाडाखोड केलेल्या वाहनांवर लक्ष्य करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिलेआहे. कारवाईची विशेष मोहीम वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या पथकाने अशा सर्व संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करून, ५२५ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

‘संशयास्पद वाहनांकडून वसूल केलेला दंड’
-विनानंबर, तुटलेली नंबर प्लेट : १८१ – ३६,२००
-विना लायसन्स : १०० -२०,०००
-वनवे तोडणे : ५६-११,२००
-पोलीस इशारा न जुमानणे : ९६-१९,२००
-अतिवेगाने वाहन चालवणे : ९२-९२,०००