बदलीमुळे नाराज झालेल्या पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अचानक बदली झाल्याने नाराज झालेल्या एका पोलीस अधिका-याने नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूरात बुधवारी (दि. 14) उघडकीस आली आहे. काळे यांनी कोल्हापूरातील चिकुर्डे पुलावरून वारणा नदीत उडी घेतली. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रदीप काळे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलीस अधिका-याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काळे कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची तडकाफडकी बदली झाली होती. बदलीच्या कारणास्तव काळे नाराज असल्याची चर्चा होती. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहून आभार व्यक्त केले होते.