Kondhwa Khadi Machine Chowk | कोंढवा खडी मशीन चौक ते मंतरवाडी रस्ता रुंद करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश

पुणे : कोंढवा खडी मशीन चौक ते हांडेवाडी मार्गे मंतरवाडी कडे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण करा, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सार्वजनिक बांधकाम विकास विभागाला दिला. कात्रज येथून कोंढव्यापर्यंत जेवढ्या लेनचा रस्ता आहे, तेवढ्याच लेनचा रस्ता पुढे मंतरवाडी पर्यंत करा असे स्पष्ट निर्देशच पवार यांनी अधिकार्‍यांना दिले. (Kondhwa Khadi Machine Chowk)

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी अचानकपणे कात्रज- कोंढवा रस्त्याच्या कामाची पाहाणी केली. यावेळी रुंदीकरणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना भूसंपादनासाठी लवकरच २०० कोटी रुपये महापालिकेला देण्यात येतील, असेही आश्‍वासित केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी सांगितले. याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आमदार चेतन तुपे, महापालिकेचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने कात्रज ते कोंढवा खडीमशीन चौकादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतू भूसंपादनातील अडचणींमुळे बर्‍याच वर्षांपासून हे काम रखडले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने कात्रज येथील वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू केल्याने कात्रज चौकातील वाहतूक कोंडी टळणार आहे. तसेच कोंढवा व कात्रज येथील काही जमिनी ताब्यात आल्याने तीन वर्षांपासून धीम्या गतीने सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या व ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती मिळाली आहे. या रस्त्याच्या भुसंपादनासाठी राज्य शासनाने २०० कोटी रुपये निधी जाहीर केला आहे, तोही लवकर उपलब्ध करून देण्यात येईल

यावेळी अजित पवार यांनी कात्रज खडी मशीन चौकाकडून उंड्री मार्गे मंतरवाडीकडे जाणार्‍या रस्त्याबाबतही माहिती घेतली. कात्रज खडी मशीन चौक ते उंड्री मार्गे मंतरवाडीकडे जाणारा रस्ता २४ मी. असल्याने भविष्यात कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, देवाची उरूळी परिसरात होईल. पर्यायी रिंगरोडची रुंदीही पीएमआरडीच्या व महापालिकेच्या आराखड्यात २४ मी.च दाखविण्यात आली असून महापालिकेने त्यानुसार सहा बांधकामांना परवानग्या दिल्या आहेत. यामुळे भविष्यात या रस्त्यावर बॉटलनेक तयार होउन मोठी कोंडी होणार असल्याकडे पोलीसनामाने सातत्याने लक्ष वेधले. याची दखलच पालकमंत्री पवार यांनी या भेटीदरम्यान घेतली. अजित पवार यांनी खडी मशीन चौकातून उंड्री मार्गे जाणार्‍या वाहनांची संख्या व अन्य बाबींची विचारणा अधिकार्‍यांकडे केली. कात्रज ते खडीमशीन चौक रस्ता ५० मी. रुंद असताना खडी मशीन चौकाच्या पुढे २४ मी. रस्ता राहील्यास वाहतूक कोंडी होणार नाही ? असे निदर्शनास आणून देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना कात्रज ते खडी मशीन चौकादरम्यान जेवढ्या लेनचा रस्ता आहे, तेवढाच रस्ता खडी मशीन चौक ते मंतरवाडी पर्यंत करण्याचे आदेश दिले, अशी माहिती विकास ढाकणे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

२२ जानेवारी रोजी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल