संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर 18 जणांनी केला सलग 9 दिवस बलात्कार, प्रचंड खळबळ

कोटा : एका 15 वर्षीय मुलीवर तब्बल 18 जणांकडून 9 दिवस बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 20 जणांना अटक केली करण्यात आली आहे. यामध्ये 4 अल्पवयीन मुलांचा आणि एका महिलेचा समावेश आहे.

राजस्थानमधील हाडौती (जि. कोटा) येथे ही घटना घडली आहे. नराधम आरोपीनी अल्पवयीन मुलीवर तब्बल 9 दिवस अत्याचार केला. अत्याचार करताना ती जीवाच्या आकांतानं ओरडत होती. त्यावेळी आरोपी अंमली पदार्थ देवून तिला शांत करत असत. मला घरी जाऊ द्या, अशी विनंती पीडित तरुणीने नराधमांकडे केली असता तिला मारहाण करून चाकूने धमकावले जात असे.

याबाबत कोटाचे जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 25 फेब्रुवारी 2021 रोजी घडला आहे. आरोपी चौथमल, बुलबुल उर्फ पूजा जैन पीडितेला बॅग देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. त्यांनी तिथे तीन-चार मुलांना बोलावल आणि पीडितेला त्यांच्या स्वाधिन केले. त्यानंतर तिला गागरोन व त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली. पीडितेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर 6 मार्चला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीला अटक केली आहे.