ड्रग्ज केस : क्षितीज प्रसादकडून कोर्टात NCB वर गंभीर आरोप, म्हणाला – ‘ही 3 नावे घेण्यासाठी करण्यात आली बळजबरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दीपिका, सारा आणि श्रध्दानंतर बॉलिवूडमधील तीन मोठे स्टार्स एनसीबीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली होती. अशातच एनसीबीने माझी सतत छळवणूक करुन अभिनेता अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया यांना अंमली पदार्थांच्या या प्रकरणात गुंतवण्यासाठी बळजबरी करण्यात आल्याचा धक्कादायक जबाब अटक आरोपी क्षितिज प्रसादने आज विशेष एनडीपीएस न्यायालयात नोंदवला.

एनसीबी कोठडीची मुदत संपल्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धर्माटिक एंटरटेन्मेंटचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला न्यायालयात हजार केले होते. त्यावेळी तपास यंत्रणेबाबत काही तक्रार आहे का, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला होता. तेव्हा प्रसादने कोर्टात याबाबत माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने तपास अधिकाऱ्यास हजर राहण्याचे आदेश दिले. पण त्या अधिकाऱ्यास कोरोनाची लक्षणे असल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात असल्याचं, एनसीबीच्या वकिलांनी सांगितलं.

… तर तुझ्या पत्नीलाही अडकवू
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत क्षितिज प्रसादने न्यायालयात सांगितलं की, “वानखेडे यांनी दिग्दर्शक करण जोहर आणि त्यांच्या धर्मा प्रॉडक्शन्स कंपनीतील नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणत थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. याबाबत २७ सप्टेंबरला मी न्यायाधीशांना सांगितले आणि मला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. परत वानखेडे यांनी पुन्हा दबाव आणत माझ्या मनाविरुद्ध जबाब नोंदवून त्यात अनेक गोष्टी घुसडल्या आणि माझी स्वाक्षरी घेतली. तेव्हा पुन्हा धर्मा प्रॉडक्शन्समधील अनेकांची नावे जबाबात नोंद करण्याची सक्ती त्यांनी त्यांनी केली. तसेच अभिनेता अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, डिनो मोरिया यांना सुद्धा या प्रकरणात ओढण्यास सांगितले. मी साफ नकार दिल्यास तेव्हा आमचे ऐकले नाही तर तुझी पत्नी आणि कुटूंबीयांना देखील यामध्ये अडकवू, असे समीर वानखेडे यांनी धमकावले,” असे क्षितिजने न्यायालयासमोर सांगितले.

दरम्यान, क्षितिज प्रसादचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे यांनी याबद्दल न्यायालयात माहिती देऊन क्षितिजचे लेखी मत सादर केले. तसेच साथीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन देखील क्षितिजने माहिती दिल्याचे मानेशिंदे म्हणाले.