…म्हणून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी सोपवली कन्येवर ‘बहुजन रयत परिषद’ची जबाबदारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व सद्यस्थितीस भाजपात असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी बहुजन रयत परिषद या संघटनेचे सर्व अधिकार आपली कन्या कोमल ढोबळे-साळूंखे यांच्याकडे सोपवले आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून सक्रिय होणार आहेत.

लक्ष्मण ढोबळे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. मंगळवेढा, मोहोळ विधानसभा मतदारसंघांतून ढोबळेंनी वीस वर्षे प्रतिनिधित्व केलं. मोहोळ राखीव मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांनी पालकमंत्री पदाची संधी दिली. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत भाजपात प्रवेश केला. मागील पाच वर्षाच्या कालावधीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे गटांचा आश्रय घेतला.

तथापि, ढोबळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारांचा वारसा महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी बहुजन रयत परिषद या संघटनेची स्थापन केली. पक्षात काम करत असताना संघटनेची स्थापना काहींच्या नजरेस पडल्यानंतर त्याचा ढोबळे यांना त्रास सोसावा लागला. तो सोसतच त्यांनी संघटनेचा विस्तार केला. आता संघटनेचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने त्याची जबाबदारी ढोबळे यांनी कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांच्यावर सोपवली आहे.

सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गट व अन्य महिलांसंबंधी कार्यक्रमातून कोमल ढोबळे-साळुंखे या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. आता त्या संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या आहेत. ढोबळे यांचे राजकीय वारसदार म्हणून पुत्र अभिजित ढोबळे यांच्याकडे पाहिले जात होते. ते चपळगाव (ता. अक्कलकोट) येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र, राजकारणात त्यांचा पाहिजे तसा प्रभाव पडला नाही. त्याच पार्श्वभूमीवर कोमल ढोबळे – साळुंखे यांना देण्यात आलेल्या संधीच्या माध्यमातून त्यांना राजकरणात संधीचे सोने करता येते का? हे पहावे लागणार आहे.