पावसाळ्यात असतो गंभीर ‘ब्राँकायटीस’चा धोका ! ‘असा’ करा बचाव

पोलिसनामा ऑनलाइन  – पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात अनेक आजारांचा धोका असतो. सर्दी, खोकला, न्युमोनिया, अ‍ॅलर्जी, अस्थमा अशा अनेक आजारांचा या दिवसात धोका जास्त असतो. यापैकीच एक समस्या आहे ती म्हणजे ब्राँकायटीस हा आजार. जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर घातक ठरू शकतं. आज आपण ब्राँकायटीस या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.

ब्राँकायटीस म्हणजे काय ?

डॉक्टर सांगतात की, “ब्राँकायटीस झालेल्या व्यक्तीच्या श्वसननलिकेत सूज येते. यामुळं त्याला खूप खोकला येतो आणि जास्त प्रमाणात कफ पडतो. श्वसननलिका कमजोर होते. जास्त प्रमाणात कफ निर्माण झाल्यानं श्वसननलिकेत अवरोध निर्माण होतो आणि फुप्फुसं जास्त प्रमाणात खराब होतात. या रुग्णांना श्वास घ्यायला जास्त त्रास होतो.

ब्राँकायटीसचे प्रकार आणि लक्षणं

ब्राँकायटीसचे दोन प्रकार आहेत. एक आहे एक्युट ब्राँकायटीस आणि दुसरा आहे क्रॉनिक ब्राँकायटीस.

1) एक्युट ब्राँकायटीसची लक्षणं –

– साधारण सर्दी, ताप
– कफ झाल्यानं छातीत त्रास होतो.
– श्वास घ्यायला त्रास होतो.
– लहान मुलांना हा आजार जास्त प्रमाणात होतो.

2) क्रॉनिक ब्राँकायटीसची लक्षणं –

– जास्त कफ
– जास्त खोकला

जास्त प्रमाणात धूम्रपान केल्यानंही हा आजार होतो. यामुळं फुप्फुसांना झालेलं नुकसान कधीच भरून येत नाही. जर योग्य उपचार केले नाही तर त्याला बरे व्हायला अनेक महिने लागतात.

कसा कराल ब्राँकायटीसपासून बचाव ?

यापासून बचाव करायचा असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात कोणत्या पदार्थांचं सेवन करावं हे आपण जाणून घेऊयात.

– आलं, लसूण, मध, निलगिरीचं तेल, सैंधव मीठ आणि हळद हे या आजारापासून वाचण्याचे घरगुती उपाय आहेत.

– आपल्या आहारात जास्तीत जास्त धान्य आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट (अक्रोड, बदाम, ट्युना आणि साल्मन मासे) असणाऱ्या पदार्थांचं सेवन करावं.

– सुकामेवा जास्त प्रमाणात खावा. त्यात बदाम आणि अक्रोड जास्त खावं.

– पावसाळ्यात काढा, ग्रीन टी आणि भाज्यांचं सूप घ्यावं.

– संसर्गापासून वाचण्यासाठी अँटी ऑक्सिडंट जास्त प्रमाणात घ्यावेत. यासाठी हळद, आलं, लसूण या सर्वांचा आाहारात सावेश करायला हवा.

– तेल आणि चरबीयुक्त खाण्यापासून बचाव करावा. बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळावं.

– पावसाळ्यात कच्चा पालीभाजा आणि कोशिंबीर खाणं टाळावं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा आणि लिंबू खावं.

– आरोग्य तज्ज्ञांच्या मते या ऋतुत मांसाहार करू नये.

ब्राँकायटीसच्या रुग्णांनी या गोष्टीची काळजी घ्यावी

जर ब्राँकायटीस हा आजार झाला तर थोडी काळजी घेऊनही हा आजार बरा होतो. परंतु सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अधिक काळ असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. जर खोकल्यासोबत रक्त निघत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात कफ पडत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते क्रॉनिक ब्राँकायटीसचं लक्षण असू शकतं. यामुळं असं काही असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच यावर उपचार घ्यायला हवेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.