LIC च्या कर्मचार्‍यांसाठी ‘डबल’ खुशखबर ! सरकारकडून एकदाच मिळाली ‘ही’ 2 गिफ्ट; 1 लाख 40 हजार जणांना होणार लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांना खूष करणारे दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. LIC च्या कर्मचाऱ्यांना तब्बल 25 टक्के वेतनावाढ सरकारने मंजूर केली आहे. तसेच LIC मध्ये आता 5 दिवसांचा आठवडा देखील सरकारने मान्य केला आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी (दि. 15) LIC च्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन श्रेणीचा अध्यादेश जारी केला आहे. यामुळे जवळपास 1 लाख 40 हजार कर्मचा-यांना लाभ होणार आहे. वेतनवाढीच्या वृत्ताने कमर्चाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.

नवीन वेतनवाढ 1 ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे. 2017 पासून एलआयसीमध्ये वेतन आढावा बाकी होता. त्यामुळे वेतनवाढीचा फरक 1 ऑगस्ट 2017 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कर्मचारी संघटनांनी 40 टक्के वेतवाढीची मागणी केली होती. मात्र 25 टक्के वेतनवाढीवर करार झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा LIC ला आता लागू होणार आहे. त्यामुळे आता LIC ची सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस काम करतील. प्रत्येक शनिवार आता रविवार प्रमाणे सुट्टी ग्राह्य धरली जाणार आहे. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एलआयसीतील हिस्सा विक्री करण्याची घोषणा केली होती. या हिस्सा विक्रीतून किमान 1 लाख कोटींचा निधी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे.