भय्यूजी महाराज यांचा जीवन प्रवास

इंदाैर : पोलीसनामा ऑनलाईन

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आज (मंगळवारी) आपल्या राहत्या घरी इंदूरमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. काैटूंबिक ताण-तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्याबाबतची चिठ्ठी देखील त्यांच्या घरात मिळाली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलं आहे की आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये. गोळी झाडल्याचा आवाज आश्रमातील लोकांना आला तेव्हा त्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीचा दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. समाजकारण , राजकारण, क्रीडा, कला, अध्यात्म, सांस्कृतीक सामाजिक, आदी क्षेत्रात वावर असणार्‍या भय्‍यूजी महाराजांचा देशभर विशेषत: मध्य प्रदेश आणि महाराष्‍ट्रात मोठा अनुयायी वर्ग होता. तसेच अनेक दिग्‍गज राजकीय नेते त्यांना गुरूस्थानी मानत होते. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने भय्‍यूजी महाराज यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. मात्र अध्यात्‍मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना अशा पदांची गरज नसते असे सांगत त्यांनी पदाचा स्वीकार केला नव्हता.

राष्ट्रसंत भय्‍यूजी महाराज यांचा जन्‍म मध्य प्रदेशातील शाजापूर येथे २९ एप्रिल १९६८ मध्ये झाला. त्यांचे मुळ नाव उदयसिंह विश्वासराव देशमुख असे होते. वडील विश्वासराव देशमुख हे महाराष्‍ट्रातील काँग्रेसचे ज्येष्‍ठ नेते म्हणून कार्यरत होते. त्यांनी सुरूवातीच्या कालावधीत सियाराम या कपड्याच्या कंपनीमध्ये माॅडेलींग देखील केलं आहे. मात्र फार कालावधीसाठी ते काही या क्षेत्रामध्ये रमले नाहीत. सुरूवातीपासूनच अध्यात्माकडे त्यांचा कल असल्यामुळे ते अध्यात्मिक गुरू झाले.

अध्यात्मिक क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी सूर्य देवाची उपासना केली. अध्यात्मा बरोबरच ते समाजकारण आणि राजकारणात देखील सक्रिय झाले. नाथ संप्रदायाला व दत्तगुरुंना आपले गुरू मानणाऱ्या भय्यूजी महाराजांनी अध्यात्मिक सिद्धी प्राप्त केल्याचा दावा त्यांच्या भक्तांनी केला आहे. त्यांना वेगवान गाड्यांची व तलवारबाजीची प्रचंड आवड होती. तसेच त्यांना घोडेस्वारीचा देखील मोठा छंद होता. आपल्या आध्यात्मिक कार्याला त्यांनी आधुनिकतेची सांगड घालून आपले कार्य त्यांनी चालू ठेवले होते. भय्यूजी महाराजांनी कधीच स्वतःला देव किंवा त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे त्यांनी कधी सांगितले नाही. अध्यात्मिक कार्याकडे येण्यापूर्वी त्यांनी ६ महिने अज्ञातवासात राहून चिंतन केले. त्याकाळात वाचन, अभ्यास करुन संत म्हणून लोकांसमोर आले. राजकारणी, उद्योजक यांसह अनेक दिग्गज त्यांचे शिष्य आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक राजकीय व्यक्ती त्यांचे शिष्य होते.

भैय्यूजी महाराजांनी आपल्या अध्यात्मिक कार्याला समाजकार्याची योग्य जोड दिली होती. त्यांनी आपल्या आश्रमाच्या माध्यमातून मराठवाड्यात दुष्काळ पडला असताना पाणलोट क्षेत्राची कामे केली. मध्येप्रदेशासह महाराष्ट्रात त्यांनी शेतीच्या संदर्भात मोठी कामं केली आहेत. सूर्याेदय चळवळीतून शेतीच्या विकासासाठी प्रयत्न केले. स्वयंरोजगार, ग्राम संमृद्धी योजना, तीर्थ क्षेत्र स्वच्छता अभियान, द्रारिद्र्य निर्मूलन, आयुर्वेदीक आैषधी प्रकल्प अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यामातून सांभाळली. त्यांचे पर्यावरण क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे. ते आपले अध्यात्मिक कार्य करत असताना गुरू दक्षिणा म्हणून लोकांकडून झाडे लावून घेत होते. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत 18 लाख वृक्षांची लागवड केली आहे. आदिवाशी भागात त्यांनी जवळपास 1 हजार तलाव खोदले आहते. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांकडून त्यांनी कधी हार, नारळ, सत्कार स्वीकारला नाही. त्यातून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभारले.