US Capitol Violence : अमेरिकेत गोंधळ ! वॉशिंग्टनमध्ये 15 दिवसांसाठी आणीबाणी, हिंसेत 4 लोकांचा मृत्यू, 52 जणांना अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो समर्थक अमेरिकन कॅपिटलमध्ये घुसले आणि पोलीसांसोबत त्यांची चकमक झाली. या घटनेत एका महिलेसह चार लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. सोबतच नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांच्या नावावर होणारे शिक्कामोर्तब होण्याची संविधानिक प्रक्रिया बाधित झाली.

बुधवारी काँग्रेसचे सदस्य इलेक्टोरल कॉलेज मतांची मोजणी करत होते, या दरम्यान मोठ्या संख्येने ट्रम्प समर्थक सुरक्षा व्यवस्था भेदून कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले. पोलिसांना या आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. या स्थितीत प्रतिनिधी सभा आणि सिनेट तसेच संपूर्ण कॅपिटल बंद करण्यात आले. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस आणि खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बिघडलेली स्थिती पाहता राष्ट्रीय राजधानीत कर्फ्यू लावण्यात आला. परंतु, मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते कर्फ्यूचे उल्लंघन करत रस्त्यावर उतरले.

या घटनेशी संबंधीत अपडेट्स पुढील प्रमाणे-

* नेवादाच्या इलेक्टोरल मतांना रिपब्लिकन प्रतिनिधींनी आव्हान दिले होते, परंतु, कोणत्याही सिनेटरने आक्षेपावर हस्ताक्षर केले नाही. यामुळे ही मते स्वीकारण्यात आली.

* अमेरिकन काँग्रेससाठी हे लाजिरवाणे दृश्य आहे. सत्तेचे शांततेने आणि व्यवस्थित हस्तांतरण व्हावे – ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

* हिंसा कधीही विजयी होत नाही, स्वातंत्र्य विजयी होते – उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस

* बायडेन विजयी घोषित
यूएस हाऊस आणि सिनेटने संयुक्त सत्र पुन्हा सुरू केले. इलेक्टोरल कॉलेज मतांना प्रमाणित केल्याने जो बाइडेन यांना विजयी घोषित करण्यात आले.

* एफबीआयने संशयित दोन स्फोटके केली निष्क्रिय.

* हिंसेप्रकरणी 52 लोकांना अटक केल्याचे वॉशिंग्टन पोलीस प्रमुखांनी सांगितले.

* हिंसेत 4 लोकांचा मृत्यू, एका महिलेला पोलिसांची गोळी लागली. तिघांचा उपचार सुरू असतना मृत्यू.

* वॉशिंग्टनमध्ये 15 दिवसांसाठी आणीबाणी जाहीर.

* ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, न्यूझीलँडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न आणि संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतारेस यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी अमेरिकेतील हिंसेचा निषेध केला.

* ट्रम्प यांना ताबडतोब हटवले जाऊ शकते
अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प यांन ताबडतोब पदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या ट्रम्प यांच्या कार्यकाळातील दोन आठवडे बाकी आहेत. परंतु, सुमारे दोन डझनपेक्षा जास्त डेमोक्रेट खासदार त्यांच्याविरूद्ध पुन्हा महाभियोग आणण्याच्य तयारीत आहेत.

* 20 जानेवारीला पदाची शपथ घेणार बायडेन-हॅरिस.