चेन्नई पोलिसांनी केला Loan App रॅकेटचा फर्दाफाश, चीनच्या 2 नागरिकांसह चौघांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एका लोन अ‍ॅप रॅकेटचा फर्दाफाश करण्यात तामिळनाडू पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चीनच्या दोन नागरिकांसहित 4 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात कर्ज देत होते आणि ते वसूल करण्यासाठी धमकीचे फोनही करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

प्रमोदा आणि पावनन (पूर्ण नाव समजू शकले नाही) तसेच अन्य दोन चीनी नागरिकांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ऑनलाइन कर्ज देणे आणि फोनवरून धमक्या देण्याच्या एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून चेन्नईच्या सेंट्रल क्राईम ब्रान्चनं एक तपास सुरू केला तेंव्हा हे प्रकरण समोर आले आहे.

लॉकडाउनमुळे आपण आर्थिक संकटात सापडलो होतो. सोशल मीडियावरील एका जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला एम रूपया या अ‍ॅपबद्दल माहिती मिळाली. तसेच हे त्वरित कर्ज देणारं अ‍ॅप होतं, अशी माहिती तक्रारदारानं पोलिसांना दिली. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्याने या अ‍ॅपच्या मदतीने 5 हजार रूपयांची रक्कम घेतली. तसंच यासाठी त्याच्याकडून 1500 हजार रुपये व्याज म्हणून आकारण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडून 100 रुपयांवर 2 टक्के व्याज घेण्यात आले. त्यानंतर धमकीचे फोनही येऊ लागल्याचे तक्रारदाराने सांगितले.

यानंतर चेन्नई क्राईम ब्रान्चनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तसंच अनेक ऑनलाइन स्वाक्षऱ्यांच्या आधारावर, आरोपींच्या बंगळुरूतील एका कॉल सेंटरबाबत माहिती मिळाली. हे कॉल सेंटर कॉल टू किंडल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, प्रमोदा आणि पावन द्वारे चालवलं जात होतं. यामध्ये जळपास 110 जण कार्यरत होते. हे कर्मचारी 9 निरनिराळ्या अ‍ॅपवरून लोन देण्याचं काम करत असल्याचंही तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर प्रमोदा आणि पावनन कथितरित्या दोन चिनी नागरिकांसाठी काम करत असल्याचे कबूल केले आहे.