Maharashtra Lockdown : ‘राज्यात 12 ते 13 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, पण…’; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी देखील लॉकडाऊन होणार असल्याचे विधान केले असल्याने कदाचीत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 12 ते 13 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज किंवा उद्या लॉकडाऊनची घोषणा करतील. पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याने परप्रांतीय कामगार आपआपल्या गावी परतू लागले आहे. या कामगारांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केले आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात लॉकडाऊन जरी जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं, बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.

दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात मुंबईचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री अस्लम शेख म्हणाले, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला सं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची परिस्थिती आजही नियंत्रणात असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.