कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले – ‘2 आठवड्यांचा कडक Lokdown हा एकमेव पर्याय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात क़डक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 2 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून येत्या 2-3 दिवसात कडक लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोणत्या वर्गाला कशी मदत करता येईल, याचीही माहिती घेतली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री वित्त विभागाशी चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.11) तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या कृती दलाच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा असे मत तज्ज्ञांनी मांडले. परंतू लगेचच लॉकडाऊन न करता सर्वसामान्यांना 2-3 दिवसाची वेळ द्यावी अशी मागणी राजकीय नेते, व्यापाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. आंबेडकर जयंतीनंतर म्हणजेच 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. सर्वांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कृती दलांच्या सदस्यांशी ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, खाटांची उपलब्धता, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही आदीवर चर्चा केली. यावेळी कृती गटाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. उडवाडिया, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. ओम श्रीवास्तव, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरव आदी सहभागी झाले होते.