आता एलपीजी सिलेंडर प्रतिकिलोने मिळणार : धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी सिलेंडर संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महत्वाची घोषणा केली आहे. एलपीजी सिलेंडर आता प्रतिकिलोच्या दराने देण्यात येणार आहे. तसेच सिलेंडर विकत घेतल्यानंतर चार हप्त्यांमध्ये त्याची रक्कम भरण्याची सुविधाही आर्थिक दुर्बलांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की , ‘देशातील प्रत्येक गरिबाच्या घरी सिलेंडर पोहचवण्यासाठी ‘उज्ज्‍वला योजना’ राबविली जात आहे. या योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील ५ कोटी लोकांना घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करुन दिला आहे. त्यातील उत्तर प्रदेशातील १.६ कोटी लोकांनी या योजनेचा आतापर्यंत थेट लाभ घेतला आहे.

पण लाभार्थींपैकी २० टक्के ग्राहक सवलतीच्या दरातील रक्कमही एकहाती भरू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना प्रतिकिलोने गॅस देण्याची तसेचं चार हफ्त्यांमध्ये सिलेंडरची रक्कम भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात ही सुविधा यशस्वी झाल्यास ती देशभर लागू करण्यात येणार आहे.