Lockdown in Maharashtra : राज्यातील Lockdown मध्ये 15 मे नंतर पुन्हा वाढ होणार का? आरोग्यमंत्री म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. अर्थात हे निर्बध १५ मे पर्यंत वाढवले आहेत. मात्र हे निर्बंध आणखी वाढणार का? यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात रोज पातळीवर ५० हजारांहून जास्त रुग्ण वाढत आहेत. म्हणून परिस्थिती पाहिजे तशी नियंत्रणात आलेली नाही. यामुळे महाराष्ट्रात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असे टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हवा तसा कमी झालेला नाही. ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. मात्र परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. म्हणून निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. तसेच, काही जिल्ह्यात अद्याप कोव्हीड बाधित रुग्णांची संख्यात वाढ होत आहे. राज्यातील लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल, असे टोपे म्हणाले.

या दरम्यान, महाराष्ट्रात सरकार तिसऱ्या लाटेसाठी देखील तयारी करत आहे. तर, बेड्स वाढवणे, प्राणवायू, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच अन्य वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच पुढे ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनंही सरकार प्रयत्नशील आहे, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.