ठाकरे सरकारसमोर मोठा पेच ! 10 वीची परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कसे करायचे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. मात्र आता विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कोणत्या आधारावर केले जाणार, विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वीत कोणत्या आधारावर प्रवेश दिला जाणार ? याबाबतचा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. दरम्यान 11 वीच्या प्रवेशासाठी सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये मार्कांवर स्पर्धा असते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मार्क कशाच्या आधारावर द्यायचे? असा मोठा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी एक प्रवेश परीक्षा घेता येईल का? या पर्यायाची चाचपणी सुरु असल्याचे समजते.

दहावीच्या परीक्षेसाठी सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डात सेमिस्टर पद्धत असते. तसेच अंतर्गत मूल्यांकनही होत असते. याआधारावर विद्यार्थ्यांना 10 वीचा निकाल दिला जाऊ शकतो. परंतु महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची केवळ बोर्डाची परीक्षा होत असते. तसेच अंतर्गत मूल्यांकनही फक्त 20 गुणांचे असते. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतरही विद्यार्थ्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी एक परीक्षा घेता येईल का? याची चाचपणी सुरु आहे. जर अशी परीक्षा झाली तर ती कशी घ्यावी, त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, या पर्यायावर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे. आपली मूल्यांकन पद्धत इतर बोर्डांसारखी नसल्यामुळे नेमके काय करता येईल, यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरु आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 10 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल, याबाबत केंद्र सरकारच्या सूचनांचा विचार केला जाईल. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, आज शिक्षण विभागाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील सर्व संभ्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर 10 च्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.