Maharashtra Budget 2021 : अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘या’ चार जिल्ह्यात Medical College उभारणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात अजित पवारांनी राज्यात सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा आदी चार जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये उभारणार असल्याची मोठी घोषणा केली.
तसेच राज्यात आरोग्य सेवेसाठी यंदा तब्बल 7 हजार 500 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
गेल्या वर्षापर्यंत अर्थसंकल्पापूर्वी आमदारांकडून आमच्या जिल्ह्याला धरण द्या, अशी मागणी केली जात असे. पण यंदा कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आता अनेक आमदारांनी आमच्या जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी अर्थमंत्री पवारांकडे केली होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाची 12 जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू होते. अखेर 4 जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. सातारा, सिंधुदुर्ग आणि अलिबागमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे.

अथमंत्री पवारांच्या अर्थसंकल्पातील घोषणा :

1) उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
2) कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद
3) राज्यात आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटींची तरतूद
4) कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटींचा महावितरणला निधी
5) जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना 12 हजार 919 कोटींचा निधी
6) विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी
7) कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटींची तरतूद