अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शेतमाल प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी प्रकल्प राबिवणार असल्याचेही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी दिले जाणार आहे. सिंचन विभागासाठी 12 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

2021-22 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत अजित पवार यांनी सादर केला. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या. बाजार समिती बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे. इंदापूर, बारामती सिंचन प्रकल्पासाठी 12 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय विकेल ते पिकेल या योजनेसाठी 2100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच पक्का गोठा बांधण्यासाठी सरकारकडून अर्थसाह्य केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सिंचन विभागासाठी 12 हजार कोटी

कृषी क्षेत्राने सरकारला सावरले आहे. राज्यातील सिंचन विभागासाठी 12,919 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पूरक अशा योजनांसाठी भरीव तरतूदही सरकारकडून करण्यात येणार आहे.

संकटापुढे महाराष्ट्र झुकला नाही

कोरोनाशी आपण अजूनही लढत आहोत. कोरोना महामारीसारखे मोठे संकट राज्यावर आले होते. मात्र, या संकटापुढे महाराष्ट्र झुकला नाही, असेही अर्थमंत्री पवार म्हणाले.