राजकारण ‘कबड्डी’ सारखं ! पाय खेचण्यात यशस्वी तो ‘मुख्यमंत्री’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व उद्योग जगतातील महत्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला. राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा मानला जातोय. उद्योगांना येणाऱ्या सर्व अडचणी व समस्या दूर करणार असून, राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्योगपतींना दिली.

या बैठकीला उपस्थित असलेले उद्योगपती आनंद महिंद्र यांना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही ‘कार’ बनवता तर आम्ही ‘सरकार’. राजकारण हे कबड्डी सारखं आहे. जो विरोधकांचे पाय खेचण्यात यशस्वी होते तोच मुख्यमंत्री बनतो. राज्यशासन आणि CII च्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास मान्यवर उद्योजकांची उपस्थिती होती. मुंबईतल्या सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरे शैलीत फटकेबाजी केल्याचे ट्विट उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले आहे. एवढेच नाही तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील गोयंका यांनी कौतुक केले.

हर्ष गोयंका यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार आणि सरकारच्या वक्तव्याबाबत ट्विट केले आहे. या बैठकीसाठी सरकारकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई, अनिल परब आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत अनेक बड्या उद्योगपतींनी हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. यामध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, उद्योगपती रतन टाटा, उदय कोटक, आनंद महिंद्र, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/