मुंबई HC ने ठाकरे सरकारला फटकारले, म्हणाले – SSC परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे नुकसान का करता?

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10 वीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी (दि. 20) सुनावणी सुरू होती. त्यावेळी परीक्षा या मुद्द्यावरून न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली. 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर ती कधी घेणार आहात? दहावीची रद्द करून तुम्ही 12 वीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे?’ अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनात 10 वीची परीक्षा अत्यंत महत्वाची असते. ती रद्द करून तुम्ही शिक्षणव्यवस्थेचे नुकसान करत आहात. जवळपास 14 लाख विद्यार्थी असलेल्या बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मग जवळपास 16 लाख विद्यार्थी असलेल्या दहावीची परीक्षा रद्द का केली? असा भेदभाव का? असा सवाल खंडपीठाने राज्य सरकारला विचारला आहे. विद्यार्थ्यांचा 10 वीचा निकाल कसा लावायचा. याविषयी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने काहीतरी तयारी केली आहे. पण महाराष्ट्राच्या एसएससी बोर्डाची काहीच तयारी नाही. परीक्षा रद्द केली आणि गप्प बसले. बस्स विद्यार्थ्यांचा काहीच विचार नाही, अशा शब्दात खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. सीबीएसईने दिवस कमी राहिल्याचे पाहून अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी केला आहे. तसा काहीतरी विचार करून राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. पण परीक्षा घ्यायचीच नाही दहावीची, ही राज्य सरकारची भूमिका चुकीची असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकादार धनंजय कुलकर्णी यांच्यातर्फे अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी म्हणणे मांडले आहे.